सत्कृत्य
स्काऊट आणि गाईड शिक्षण समाजाभिमुख आहे. सेवा ही स्काऊटिंगची मूळ भावना आहे. आपण रहात असलेल्या समाजाचे ऋण आपल्यावर असतात. समाजाकडून आपण काही चांगले शिकत असतो तर काही वेळेस समाजाला आपली गरज ही असते. समाजाचे हे ऋण आपण समाजाला गरज असताना समाजसेवेच्या रूपाने आपण पूर्ण करतो. “सेवेचे शिक्षण” म्हणजे केवळ तत्वे शिकवणे असे नाही, तर इतरांविषयी सदिच्छा बाळगण्याची वृत्ती निर्माण करणे व प्रत्यक्षात त्यांचा अविष्कार होय. हा आविष्कार म्हणजे सत्कृत्य.
नमस्कार , आपले ऑल अबाऊट स्काऊटिंगच्या वेबसाईट वर सहर्ष स्वागत . आज आपण सत्कृत्याबद्दल माहिती घेणार आहोत.
सत्कृत्य म्हणजे काय ?
सत्कृत्य म्हणजे चांगले काम. विनामोबदला सेवा स्वरूपात केलेले काम म्हणजे सत्कृत्य होय. स्काऊट आणि गाईड म्हणून तुम्हाला रोज निदान एक तरी सत्कृत्य करावे लागेल. हे काम तुम्ही निरपेक्ष वृत्तीने केले पाहिजे . सत्कृत्य केल्याने स्काउटला आत्मिक समाधान लाभते. स्काऊटिंग मध्ये सत्कृत्याची सुरुवात कशी झाली ? याबाबत जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
सत्कृत्याची गाठ –
सकाळी उठल्यावर आजच्या दिवसात एक तरी सत्कृत्य करावयाचे आहे, याची आठवण ठेवावी. सत्कृत्य हे स्काऊटचे कर्तव्य आहे. स्काऊट त्यासाठी त्यांच्या स्कार्फची दोन टोके गाठ मारून ठेवतात. ही गाठ म्हणजे सत्कृत्याची गाठ होय. ही सत्कृत्याची गाठ बांधण्यासाठी स्काऊट अंगठा गाठीचा ( थंब नॉट ) वापर करतात. ज्या स्काऊटचे दैनिक सत्कृत्य पूर्ण होते , त्यादिवशी तो ती गाठ सोडतो.
एकदिवसात किती सत्कृत्ये करावीत ?
एखाद्या दिवशी सत्कृत्य करावयाचे राहून गेले तर दुसऱ्या दिवशी दोन सत्कृत्य करावी. मात्र एका दिवशी एकच करावे असे बंधन नाही त्यापेक्षा अधिक कामे केली तरीही अति उत्तम .
सत्कृत्याबद्दल स्काऊट गाईडला किती पैसे मिळतात?
सत्कृत्य करत असताना स्काऊट कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा करत नाहीत. सत्कृत्य हे स्काऊटिंगच्या सेवा या मूळ भावनेपासून प्रेरित आहे, त्यामुळे सत्कृत्य करत असताना कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा स्काऊट करत नाहीत.
जरी कोणत्या व्यक्तीने त्यांना सत्कृत्याबद्दल कसल्याही प्रकारचा मोबदला देवू केला तर स्काऊटने तो अगदी नम्रपणे नाकारला पाहिजे.
स्काऊटने नम्रपणे नाकारताना त्या व्यक्तीस म्हटले पाहिजे की, “धन्यवाद, मी एक स्काऊट आहे, आणि स्काऊटच्या नियमानुसार सत्कृत्यासाठी आम्ही कोणताही उपहार अथवा पैसे घेऊ शकत नाही. “.
सत्कृत्य करत असताना , स्काऊट किंवा गाइडने कधीही आपल्या फायद्याचा विचार केला नाही पाहिजे, या उलट त्यांनी इतरांना आपण कसे उपयोगी पडू शकू याचा ध्यास त्यांच्या मनात असला पाहिजे.
अर्थात या कामाबद्दल तुम्ही काही मोबदला स्वीकारला नाही तरच ते खरेखुरे सत्कृत्य होईल.
सत्कृत्य म्हणजे फार मोठे धाडसाचे काम नाही. तर अगदी साधे काम सुद्धा सत्कृत्ये होईल. आपण सत्कृत्य हे अगदी आपल्या घरापासून सुरु करू शकता.
सध्याच्या धावपळीच्या जीवनात मिळत नाही तेव्हा सत्कृत्यासाठी जास्तीत जास्त वेळ कुठून मिळणार?
सत्कृत्यासाठी वेळेची गरज नाही तर संधीची गरज आहे. आपण आपल्या रोजच्या व्यवहारात घरी शाळेत व समाजात कामाची संधी शोधली पाहिजे. त्यासाठी चौकस बुद्धीची व निरीक्षण शक्तीची आवश्यकता आहे. घरीदारी जाता-येता व सार्वजनिक ठिकाणी आपण सेवा करण्याची संधी शोधली पाहिजे व मिळताच सत्कृत्य केले पाहिजे.
सत्कृत्य करण्याची सवय दररोज घरकामात मदत करून लागते लहानपणापासून घरातील लहान सहान कामे करावीत, घरातील अनपेक्षित किंवा ठरविलेले कोणते ना कोणते काम केले पाहिजे. अशी सवय अंगवळणी पडल्यावर इतर लहान मोठी कामे करण्यास कमीपणा वाटत नाही. “समाजसेवा हीच ईश्वर सेवा.” , या भावनेतून त्याकडे पहावे.
सत्कृत्याची उदाहरणे –
काही सत्कृत्ये उदाहरणादाखल खाली दिली आहेत.
१ बाजारातून भाजीपाला , माल इत्यादी आणणे .
२ घरातील व्यक्तींचे छोटे मोठे काम करणे.
३ घरातील वयस्कर व्यक्तिंची सेवा करणे.
४ परिसरातील पशु पक्षांना चारा देणे.
५ अंध अपंग व्यक्तींना रस्ता ओलांडायला मदत करणे.
६ अशिक्षित लोकांना अर्ज भरून देणे.
७ स्वयंपाकात आईला मदत करणे.
हे करीत असताना आपली कार्यक्षमता वाढते व हे विश्वची माझे घर हा दृष्टिकोन तयार होऊन स्वतःचा आत्मविश्वास वाढतो. स्काऊट गाईड वचनातील ईश्वर स्वदेश व इतरांची सेवा करण्याचे कर्तव्य आपण सत्कृत्याद्वारे करीत असतो. ज्याप्रमाणे फुलांच्या गंधाने व रंगाने वाढते फुलांची माहिती वाढते फुलांची महती वाढते, त्याप्रमाणे सत्कृत्य करून स्काऊट आणि गाईड ची महती वाढवावी.
सत्कृत्य डायरीचा नमुना –
स्काऊट किंवा गाईड म्हणून आपण समाजाच्या किती उपयोगी पडतो यांचे स्वतः मूल्यमापन करण्यासाठी सत्कृत्याची नोंद करणे आवश्यक आहे त्यासाठी प्रत्येकाने एक डायरी ठेवावी दररोज केलेल्या सत्कृत्याची नोंद करावी व प्रत्येक आठवड्यास किंवा त्यातून एकदा तरी स्काऊट मास्टर किंवा गाईड कॅप्टन यांना दाखवावी.
तारीख | केलेल्या सत्कृत्याचे थोडक्यात विवरण | सही |
2/10/2020 | आज आईला भाजी निवडण्यात मदत केली. | आईची सही |
3/10/2020 | शेजारील आजोबांच्या मेडिकल मधून गोळ्या आणून दिल्या . | आजोबांची सही |
तर अश्याप्रकारे स्काऊट गाईडनी आपली सत्कृत्य नोंद वही तयार करावी.
स्काऊटिंग मध्ये सत्कृत्याची सुरुवात कशी झाली ? याबाबत जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपल्या मित्र – मैत्रिणींसोबत फेसबुक , व्हाट्सअँप वर शेअर करा.
तसेच आमचे विडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनेलला अवश्य भेट द्या व Subscribe करायला विसरू नका.